petrol diesel price : निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार? पेट्रोलियम मंत्री बोलले...

Mar 09,2022

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने हजारो भारतीय विद्यार्थी तिथे अडकले होते. आता जवळपास सर्व भारतीयांना युक्रेनमधून आणलं गेलं आहे. युक्रेनच्या सुमीमध्ये अडकलेल्या जवळपास ७०० विद्यार्थ्यांनाही तिथून सुरक्षित बाहेर काढलं आहे. त्यांना मायदेशी आणण्यात येईल. यामुळे भारताची चिंता कमी झाली आहे. पण या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. आता यामुळे भारतातही इंधनाचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या १२ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम भारतातही दिसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पेट्रोल-डझिलेमध्ये प्रतिलिटर ६ रुपयांनी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे १० मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याच्या शक्यतेदरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मोठे विधान केले आहे.

 

'निवडणुकीमुळे आम्ही पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढवले नाहीत. असे म्हणणे चुकीचे ठरेल. कंपन्यांना तेलाचे दर ठरवावे लागतात. कारण त्यांनाही बाजारात टिकून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार तेलाच्या किमती ठरतात', असे हरदीप सिंग म्हणाले. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आम्ही भारतात तेलाची कमतरता पडू देणार नाही. पुढे जो काही निर्णय घेऊ, तो नागरिकांचे हित लक्षात घेऊनच करू, असे हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले.

 

६९४ भारतीयांना सुमीमधून सुरक्षित बाहेर काढलं

 

युक्रेनच्या सुमीमध्ये अडकलेल्या ६९४ भारतीयांना तिथून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. हे विद्यार्थी बसद्वारे पोल्टावासाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती पुरी यांनी दिली.






Related Media